शिर्डी साईबाबा संस्थानाला मोठा दिलासा मिळाला आहे. संस्थानाला जे गुप्त दान मिळत होते त्यावर कर लावण्यावरून आयकर विभाग आणि संस्थानामध्ये खटला सुरु होता. यावर मुंबई हायकोर्टाने साईबाबा संस्थानाला मिळणारे गुप्त दान हे करातून सुट देण्यास पात्र असल्याचा निकाल दिला आहे.
शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्ट ही एक धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट आहे. यामुळे ही ट्रस्ट करातून सुट मिळविण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. न्यायाधीश गिरीश कुलकर्णी आणि सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने मंगळवारी हा निकाल दिला आहे.
आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (आयटीएटी) निर्णयाला आयकर विभागाने आव्हान दिले होते. ते न्यायालयाने फेटाळून लावले आहे. न्यायाधिकरणाने साईबाबा संस्थान गुप्त देणग्यांसाठी करातून सुट मिळविण्यास पात्र असल्याचे म्हटले होते. याला आयकर विभागाने आव्हान दिले होते. ही संस्था पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी स्थळाची आणि तिच्या संकुलात असलेल्या इतर सर्व मंदिरांची प्रशासकीय आणि प्रशासकीय संस्था आहे.
2019 सालापर्यंत साईबाबा ट्रस्टला एकूण 400 कोटी रुपयांहून अधिक रक्कम देणगी म्हणून मिळाली होती. यापैकी बहुतांश पैसा हा शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधांवर खर्च करण्यात आला होता. यावरून ही धर्मादाय संस्था असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर आयकर विभागाने 2015 ते 2019 दरम्यान, ट्रस्टला गुप्त देणगीच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळाली होती. या रकमेला करातून सूट देता येणार नाही, असे म्हटले होते.