Maharashtra Politics: राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या दाव्यांमुळे आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राजकारणातील प्रवेशाविषयी समीर वानखेडे यांनी सूचक विधान केले आहे. शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समीर वानखेडे आले होते. मुंबईतील शिपवर रेड झाल्यानंतर राजकारण्यांनी आपल्यावर टीका करतात. यातून आमचे खच्चीकरण झाले होते. मात्र, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना धावून आली. तेव्हा आम्हाला वाटले की, आपले मनोधैर्य वाढविणारे कोणीतरी आहे. अशी संघटना पाठीशी उभी राहिल्यानंतर राजकीय लोक जे बोलत होते. त्यावर लोकांचा विश्वास बसला नाही, असे समीर वानखेडे म्हणाले.
राजकारणात येणार का?
काही नेते सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स करायचे. तेव्हा, तुला झोप येते का असे अनेक लोक विचारायचे? तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचो. तेव्हा सर्व भीती निघून जायची. वाटायचे येऊ देत कितीही मंत्री. हे तर १०० आणि २०० किरकोळ आहेत. त्यामुळे तुमचे आदर्श महापुरुष असले पाहिजेत, असे समीर वानखेडे यांनी सांगितले. तसेच यावेळी समीर वानखेडे यांना राजकारणात येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. मला देशाची, भारत मातेची सेवा करायची आहे. मग ते कोणत्याही स्वरूपात असो, असे उत्तर समीर वानखेडे यांनी दिले. यावर, मग राजकारण हाही देश सेवा करण्यासाठी प्लॅटफॉर्म असू शकतो का? असा सवाल करण्यात आला. यावर मात्र समीर वानखेडे यांनी ते काय आता काय सांगता येत नाही. असे म्हणत राजकारणात प्रवेश करण्यावर थेटपणे उत्तर देणे टाळले.
दरम्यान, माझ्यावर आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत. ते सर्वांना माहिती आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. माझी जात काढली. मात्र, त्यांना काही सापडले नाही. लोकांना काही काम नसते तेव्हा बाष्कळ चर्चा सुरू होते, अशी टीकाही समीर वानखेडे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"