ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - युती अभेद्यच राहणार याचा पुनरुच्चार करतानाच मंगळवारी संध्याकाळी घटकपक्षांशी चर्चा करून जागावाटपाचा नवा फॉर्म्युला जाहीर करू असे भाजपा-शिवसेनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांवर हटून बसलेले शिवसेना व भाजपा जागावाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी घटकपक्षांचाच बळी घेतील अशी दाट चिन्हे दिसत आहेत.
गेल्या २५ वर्षांपासून असलेल्या भाजपा-सेना युतीत सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपाने शिवेसेनेकडे विधानसभेच्या जागा वाढवून मागितल्या होत्या मात्र केंद्रात भाजपा तर महाराष्ट्रात शिवसेना हा इतक्या वर्षांपासून असलेला फॉर्म्युला बदलण्यास सेनेने नकार दिला होता. शिवसेनेने दिलेल्या ११९ जागांचा प्रस्ताव भाजपाला अमान्य आहे, मात्र १५१ जागांच्या खाली येण्यास सेनेने नकार दिला आहे.
यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून भाजप सेना-नेत्यांमध्ये बैठका सुरू असून कोणीही तडजोड करण्यास तयार नसल्याने महायुतीच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र मंगळवारी भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शिवसेना- भाजपा नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत संध्याकाळी घटकपक्षांशी चर्चा करून जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर करू असे स्पष्ट केले. त्यामुळे आता सेना आपल्या जागांमध्ये कोणतीही तडजोड न करता घटकपक्षांच्या जागा भाजपाला देऊन महायुतीचे तिढा सोडवणार असेच चित्र दिसत आहे. शिवसेना १५० , भाजपा १२४ आणि मित्रपक्ष १४ असे जागावाटप असेल असे समजते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत (२००९) घटकपक्षांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. रामदास आठवलेंच्या 'रिपाइं'ने तब्बल ७९ जागा लढवल्या होत्या मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही उलट ७७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. हमखास निवडून येईल असा एकही उमेदवार नसल्याने आठवलेंना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे १० जागा मिळण्याची शक्यता धूसर आहे. विशेषत: सध्याच्या भाजपा-सेनेच्या जागासंघर्षात आठवलेंना दोन ते चार जागा मिळाल्या तरी पुष्कळ अशी स्थिती आहे. तर दुसरा घट पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने २००९ साली २६ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना अवघी एकच जागा जिंकता आली. त्यामुळे त्यांचीही बोळवण दोनचार जागांवर झाली तर आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये चांगला जम असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही गेल्या निवडणुकीत लढवलेल्या १४ जागांपैकी अवघ्या एका जागेवर विजय मिळाला होता. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता घटकपक्षांसाठी १० ते १२ जागा सोडून रौप्यमहोत्सवी शिवसेना- भाजपा युती वाचवली जाईल अशीच लक्षणे दिसत आहेत.
विधानसभा निवडणूक २००९
पक्ष | लढवलेल्या जागा | जिंकलेल्या जागा |
रिपाइं | ७९ | ० |
राष्ट्रीय समाज पक्ष | २६ | १ |
स्वाभिमानी शेतकरी संघटना | १४ | १ |