२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यातच गतवर्षी जुलै महिन्यात अजित पवार हे समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच भाजपाच्या मिशन ४५+ लाही बळ मिळालं आहे. अशा परिस्थितीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासमोरील आव्हान वाढलं आहेत. त्यातच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सनसनाटी दावा केला आहे.
गोपिचंद पडळकर म्हणाले की, भाजपा निवडणुका आल्यानंतर काम करत नाही. भाजपा हा दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असतो. निवडणूक कोण लढवणार हा विषय माझ्या हातात नाही. त्याबाबत आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु नरेंद्र मोदी ज्या दिवशी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार हा मोदींच्या बाजूने बोट वर करताना दिसेल. आता तो खासदार कोण असेल, ते आमचे वरिष्ठ ठरवतील.
शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ सर करण्यासाठी भाजपाकडून २०१४ पासून प्रयत्न सुरू आहेत. २०१४ मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती. तर २०१९ मध्ये भाजपाने येथे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कांचन कूल यांमा उमेदवारी दिली होती. सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलल्याने या वेळच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर कडवं आव्हान असेल.