अनुज अलंकार, मुंबई - लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींविषयी अनेक मतप्रवाह निर्माण झाले होते. त्यात बॉलीवूडकरही मागे नव्हते. एकीकडे देशात मोदी पंतप्रधान झाल्यास चांगले दिवस येतील, असे सांगितले जात असतानाच काही कलाकारांनी केलेल्या वक्तव्याने वादही झाले. सलमान खान कुटुंबीय, अजय देवगण, अक्षय कुमार हे मोदींचे समर्थक मानले जातात. त्यांनी नेहमीच मोदींना साथ दिली आहे. तर शाहरूख खान, आमीर खान, मुकेश भट्ट अशा अनेक कलाकारांनी मोदींना विरोध केला होता. शाहरूखने तर टिष्ट्वटरवरून मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडेन, असेही वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या निकालानुसार मोदीच पंतप्रधान होणार हे आता स्पष्टच झाले आहे. या गोष्टींचा अनेकांना आनंद होत असताना बॉलीवूडमधील शाहरूख, आमीर यांच्यासाठी मात्र वाईट दिवसांना सुरुवात झाली आहे, अशी चर्चा सुरू आहे. मध्यंतरी शाहरूखने टिष्ट्वटरच्या माध्यमातून मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन, असे म्हटले होते. शाहरूखच्या या वक्तव्याची आठवण सोशल मीडियाकडून होत असून, देश कधी सोडणार?, अशा आशयाचे अनेक संदेश व्यक्त होत आहेत. यामुळे चिडलेल्या शाहरूखने रविवारी संध्याकाळी पुन्हा टिष्ट्वट करून आपल्यावरील आरोपाचे खंडन करीत आपल्याविरुद्ध चाललेली बदनामी बंद करावी, असे आवाहन केले. त्यामुळे लोकांना त्याची मजा घेण्यासाठी अधिकच संधी मिळाली आहे. सुरुवातीपासूनच शाहरूख काँग्रेस समर्थक आहे. राहुल आणि प्रियंकासोबत त्याचे अगदी जवळचे संबंध आहेत. शाहरूखच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यात दोघेही अनेकदा येतात. तसेच त्यांच्यासाठी शाहरूखच्या चित्रपटाचे विशेष खेळ आयोजित केले जातात, हे सर्वश्रुत आहे. त्यातच शाहरूखने मोदींविरोधात दिलेल्या टिष्ट्वटमुळे आपण भाजपाच्या विरोधात आहोत हेच त्याने दाखवून दिले. शाहरूखपेक्षा आमीर खानसोबत मोदींचे संबंध सुरुवातीपासूनच वाईट आहेत. खरेतर, आमीर काँग्रेसचा समर्थक नाही. वैचारिकदृष्ट्या तो आम आदमी पक्षाच्या जवळचा मानला जातो. पण त्याने कधीही मोदींच्या विचारसरणीला तसेच भाजपालाही समर्थन दिलेले नाही हे तितकेच खरे. मोदींचा आमीरवर राग असण्याचे खरे कारण नर्मदा बचाव आंदोलनातील त्याचा सहभाग हे आहे. त्याने त्यास समर्थन दिल्यावर मोदी त्याच्यावर नाराज झाले होते. आंदोलनाला आमीरने दिलेली साथ, त्या वेळी केलेले व्यक्तव्य हा गुजरातचा अपमान असल्याची मोदींची धारणा होती. या नाराजीचा परिणाम आमीरच्या ‘फना’ चित्रपटावरही दिसून आला. त्या काळात हा चित्रपट गुजरातमधील एकाही चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला नाही. त्यामुळेही वाद निर्माण झाले होते. यांपैकी सलमान खान मात्र मोदींच्या जवळचा मानला जातो. जानेवारीत त्याचा ‘जय हो’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्या काळात अहमदाबादमध्ये प्रमोशनसाठी गेल्यावर मोदींची भेट घेत त्याने मोदींबरोबर पतंगबाजी केली होती. मोदींनीही त्या वेळी त्याचे मोकळेपणाने कौतुक केले होते. हा चित्रपट आपटला. मात्र सलमानच्या मोदीप्रेमाचा राग मुस्लीम समुदायाच्या एका वर्गाला आल्याने ‘जय हो’ चित्रपटावर परिणाम होऊन तो फ्लॉप ठरला, असेही म्हटले गेले. सलमानच्या कुटुंबीयांनीही नेहमी मोदींना साथ दिली आहे. मोदींच्या उर्दू वेबसाईटचे उद्घाटन सलमानचे वडील सलीम खान यांनी केले. तेव्हाही खूप चर्चा झाली. सलीम खान यांनी नेहमीच नरेंद्र मोदींचे कौतुुुक केले आहे; तसेच मोदींचेही सलीम खान यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. एकंदरीत मोदींविषयी बॉलीवूडमध्ये विविध मतप्रवाह असताना मोदी पंतप्रधान झाल्यावर हे मत बदलते की काही नवीन ऐकायला मिळते, ते येणार्या काळात कळेलच.
शाहरूख, आमीर के अब आयेंगे बुरे दिन?
By admin | Published: May 20, 2014 2:57 AM