अवघ्या देशाचे लक्ष बारामतीवर लागले आहे. शरद पवारांचे अस्तित्व संपणार की अजित पवारांचे, य़ावर चर्चा झडत आहेत. ओपिनिअन पोल धक्कादायक आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या ताब्यातून घेतली खरी परंतु या दोन्ही गटांतील आरोप-प्रत्यारोप पाहता प्रकरण खूप पुढे गेले आहे, असे दिसते. परंतु, अनेकजण ही थोरल्या पवारांचीच खेळी असल्याचेही चर्चा करत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही शरद पवार भाजपशी चर्चा करत होते, असे सांगत आहेत. यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कदाचित निवडणुकीनंतर दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असेही बोलले जात आहे. यावर अजित पवारांनी मतदान होऊद्या, त्यानंतर सांगतो असे म्हटल्याने रहस्य आणखीनच वाढले आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील नाते ताणले गेलेले आहे. निवडणुकीपूर्वी दिवाळी दरम्यानच्या बैठका, कधी उद्योगपतीच्या घरी लपून-छपून जाणे कधी कुटुंबीयांच्या घरी भेटणे असे प्रकार होत आले आहेत. यानंतर अचानक अजित पवारांनी आक्रमक भुमिका घेत शरद पवारांनावर गंभीर आरोप केले होते. आता तर सुप्रिया सुळेंच्याच विरोधात पत्नीला उभे करत थेट आव्हान दिले आहे. राजकारणात कधी कोणा कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हणतात. त्याप्रमाणे राजकारण संपले की हे दोघे एकत्र आले तर काय, अशी चर्चा ही सुरु आहे. आता लोकांना दाखवतायत आम्ही भांडतोय म्हणून, विस्तवही जात नाही म्हणून आणि नंतर परत या लोकांनी भेटी-गाठी सुरु केल्या, मांडीला मांडी लावून बसले तर बिचाऱ्या मतदारांनी काय करायचे, असा सवाल जनतेत उपस्थित होत आहे.
यातच अजित पवारांना एबीपी माझाच्या कार्यक्रमात तुम्ही दोघे परत एकत्र येणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. यावर अजित पवारांनी एकदा ७ मे रोजीचे मतदान होऊ द्या, तोवर मी यावर बोलू शकत नाही असे म्हटले आहे. याचाच अर्थ त्यांनी थेट नकार कळविलेला नाही. परंतु बारामतीत वेगळाच प्रचार सुरु असल्याचे पवारांनी म्हटले आहे. आम्ही पुढे एकत्रच येणार असे सांगितले जात आहे. हा प्रकार लोकांना बुचकळ्यात टाकणारा आहे. मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे, ही भुमिका सध्या मतदार, कार्यकर्त्यांत गेली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत.
७ मे पर्यंत भावनिक व्हायचे नाही, मऊ पडायचे नाही असे मी ठरविले असल्याचेही अजित पवार म्हणाले. समोरचे उमेदवार त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. ही लढाई भावकीची, गावकीची नाही ही देशाची लढाई आहे, असे पवार म्हणाले.