अतुल कुलकर्णी -मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट बनविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यापुढे कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी त्यांच्यासोबत असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेत प्रवेश करू शकेल. त्यादृष्टीने पडद्याआड जोरात हालचाली सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बडोदा येथे रात्री उशिरा बैठक झाली. त्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कायदेशीर लढाई लढायची असल्यास त्यात वेळ निघून जाईल आणि तेवढा धीर आमदारांमध्ये नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात नकारात्मक वातावरण तयार होण्याआधीच या प्रश्नावर तोडगा हवा आहे.
कायदेतज्ज्ञांच्या मते... - दोन तृतीयांश आमदारांनी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांची आमदारकी कायम राहते. त्यामुळे आता बंडखोर आमदारांचा गट मनसेमध्ये प्रवेश करेल. जेणेकरून त्यांची आमदारकी कायम राहील.
- शिवाय राज ठाकरे त्यांच्या पक्षात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरतात. त्यांचे नाव वापरतात. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केलेला आहेच. त्यामुळे हे सगळे फायद्याचे ठरेल, असे एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यात आल्याचे समजते.
‘दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त’उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना देखील लगेच भावी नेता म्हणून पुढे आणण्याचे काम सुरू केले. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना आपल्या भवितव्याचे काय? असा प्रश्न पडला. राज ठाकरे यांच्याबाबतीत असे नाही. त्यांनी कधीही स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितलेले नाही. माझ्या पक्षाच्या हातात सत्ता द्या. मी बदल करून दाखवतो, असे ते कायम म्हणत आले आहेत. शिवाय त्यांचा मुलगाही अजून नव्याने राजकारणात उभा राहू पाहत आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच मनसेसोबत जाण्याला शिवसेनेतील बंडखोर गटानेही मान्यता दिल्याचे समजते.
उद्धव ठाकरे गेले तरी राज ठाकरे सोबत राहतील. एक ठाकरे आपल्यासोबत आहेत, शिवाय हिंदुत्वही आहे. यासारखी चांगली परिस्थिती दुसरी असू शकणार नाही. आपण भाजपमध्ये प्रवेश करत नाही, मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत गेलो असे म्हणायला बंडखोरांचा गट मोकळा होईल. राज ठाकरे यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात स्वतःची स्पेस तयार करायची आहे. बंडखोरांचे मुख्य शत्रू देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आहेत. त्यामुळे ‘दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त’ अशी नीती असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.