ठाणे : नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच शासकीय शिवजयंती असल्याने कार्यक्रमात ‘शिवसोहळा’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, आतापर्यंत शिवसेनेने शासकीय शिवजयंती साजरी करण्यास विरोध केला असल्याने आता सरकारमध्ये बसल्यावर नाट्यसंमेलनाचे औचित्य साधून धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करायची की नाही, असा पेच स्वागताध्यक्ष व मंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.शिवसेना दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. यंदा तिथीनुसार २६ मार्च रोजी शिवजयंती आहे. मात्र, नाट्यसंमेलनानिमित्त ठाण्यात सर्वत्र संमेलनाच्या लोगोसह भगवे कंदील लावून वातावरण भगवे करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. नाट्यसंमेलनाचे उद्घाटन १९ फेब्रुवारीस असून त्याच दिवशी शासकीय शिवजयंती असल्याने या भगवामय वातावरणात ही शिवजयंती जल्लोषात साजरी केली नाही तर टीका होईल, असे येथील कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे अगोदर जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग नाट्यसंमेलनाच्या पहिल्या दिवशी साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा विचार सुरू होता. आता तो मागे पडला व शिवसोहळा हा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार होते, तेव्हा शासकीय शिवजयंतीला औपचारिक कार्यक्रम होत असे. मात्र, शिवसेना तिथीनुसार धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करीत होती. आता राज्यात भाजपा-शिवसेना सरकार असल्याने शासकीय शिवजयंतीची औपचारिकता सांभाळायची की, जल्लोषाकरिता मार्चपर्यंत थांबायचे, असा पेच शिवसेनेच्या मंडळींमध्ये निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)नाट्यसंमेलनात १९ तारखेला जाणता राजाच्या धर्तीवर कार्यक्रम होईल. कोणता कार्यक्रम होणार, हे अजून निश्चित व्हायचे आहे.- राजन विचारे, अध्यक्ष, अ.भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा
शिवजयंती साजरी होणार का?
By admin | Published: February 09, 2016 2:10 AM