पक्ष संघटना आणि विधीमंडळ हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात. यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच राहील. आमदारकी पाच वर्षांची असते, पक्ष कायम असतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवसेना कोणाची, यावर उत्तर दिले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले बंडखोरी नाट्य आज संपुष्टात आले आहे. एकनाथ शिंदे फडणवीसांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. यावर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. यावेळी पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावर बोट ठेवले.
कदाचित फडणवीसांबाबत मुद्दामहून केले गेले असावे, असे पवार म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते आता उप मुख्यमंत्री झाले. राज्यात असे प्रकार घडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नंतर मंत्रिपदे स्विकारली आहेत, असे पवार म्हणाले.
शिवसेना संपेल का, अशा प्रश्नावर पवारांनी नाही असे उत्तर दिले. आता उद्धव ठाकरेंची पावले काय असतील हे मी सांगू शकत नाही, परंतू शिवसेना संपणार नाही. पक्ष कायम असतो, आमदार पाच वर्षांचा असतो, असे पवार म्हणाले.
पहिले आश्चर्य म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपामध्ये एक आहे, दिल्लीतून आदेश असो की नागपूरहून त्यात तडजोड नसते. या आदेशात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिंदेंवर पडली, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नव्हती, अशा शब्दांत शरद पवारांनी आपल्यालाही या निर्णयाचे आश्चर्य वाटल्याचे म्हटले. दुसरे आश्चर्य म्हणजे, भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींचा आदेश असतो तो पाळावा लागतो. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागली. हे मोठे उदाहरण. मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, असे असताना त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले, असे पवार म्हणाले. सत्ता आली की मिळेल ती संधी स्वीकारायची असते हे फडणवीसांनी दाखवून दिले, असेही पवार म्हणाले.