मुंबई : भाजपाचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील कलगीतुरा पत्रकार परिषदेतून समोर आला असताना आता आघाडीच्या गोटात हालचालींनी जोर पकडला आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार अज्ञातस्थळी रवाना झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ येत्या काही दिवसांत पहायला मिळणार आहे.
महायुतीला सत्तास्थापनेएवढ्या जागा मिळाल्या असल्या तरीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रस्थानी आलेले आहेत. भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून बेबनाव झाल्याने महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. यातच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाचा कोणताही शब्द दिलेला नसल्याचे सांगितल्याने ठाकरे यांनी लोकसभे वेळच्या चर्चेचा तपशीलच उघड केला आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये खलबते सुरू झाली आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. हे काँग्रेसचे नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. पवार यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. यामुळे गांधी यांच्या संमतीनेच हे नेते पवारांच्या भेटीला जात आहेत. राज्यपाल नियमानुसार भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण देतात की शिवसेनेला देतात यावर आघाडीचा निर्णय होणार आहे. तर सायंकाळी आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान डोलवली.
यावर फडणवीस यांनी आता जर मी मुख्यमंत्री पदाचे वाटप झाल्याचे निवडणुकीआधी बोललो तर पक्षात अडचणीत येईन. माझा शब्द आहे, असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काय बोलले ते तुमच्यासमोर आहे. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांचा अश्वमेधाचा घोडा अडविला होता. आणि आताही त्यांनी गोड बोलून शिवसेना संपविण्याचे काम सुरू केले होते. तरीही शिवसेनेने त्यांचा घोडा अडविला आहे. मी चर्चा थांबविली. अनौपचारिक दृष्ट्या त्यांनी ठरलेच नव्हते, असे बोलले, तुमचा अधिकार आहे. पण मी शिवसैनिकांसमोर खोटा म्हमून जाऊ शकत नव्हतो. यामुळे त्यांचे वक्तव्य त्रासदायक होते. त्यामुळे त्यादिवशीची भाजपसोबतची चर्चा थांबविली. 50-50 टक्के मी मानलो असतो. पहिली अडीज की नंतरची यावरही मी मानले असते. लोकसभेनंतर अवजड उद्योग खाते दिले. शहा यांनी त्यावेळी सांगितले की चार दिवसांत मी काहीतरी करतो, पण त्यांनी केले नाही, यामुळे खोटे कोण बोलतो हे पहा असेही ठाकरे यांनी सांगितले.