मुंबई - 2014 मध्ये शिवसेनेला मागच्या दाराने सत्तेत सामील करून घेतल्यानंतर भाजपने नेहमीच दुय्यम वागणूक दिली. तसेच आपल्या पक्ष विस्तारासाठी शिवसेनेचे अनेक ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत राज्यात नवीन समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता असून शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं हे समिकरण असणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरुवातीपासून दंड थोपटले होते. तर शिवसेनेने भाजपसोबत युती करणे पसंत केले. परंतु, उभय पक्षातून युती केल्यानंतरही एकमेकांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी बंडखोरांना बळ दिले होते. यामध्ये भाजपचे 83 तर शिवसेनेचे 65 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये बंडखोरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन कऱण्याचा डाव भाजपचा होता. परंतु, हा डाव आता त्यांच्यावर फिरताना दिसत आहे.
दरम्यान भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयारी लावली आहे. 2014 मध्ये ज्या प्रमाणे शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाले होते. आता काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनीही असंच काहीस सांगितलं आहे. त्यांनी इशाऱ्यातून शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा सेनेला दुय्यम वागणूक दिल्यास शिवसेनेसाठी महाआघाडीसोबत जावून सत्ता स्थापन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.