राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या फाटाफुटीत पवार कुटुंबीय दोन भागात दुभंगले गेले आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट पडले असून पक्षातही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दिवाळीत पवार कुटुंबीय चार-पाचवेळा एकत्र आले होते. परंतू, आता मैदानातील खरी लढाई सुरु झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या भावाचा मुलगा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु, तो अजित दादांकडून नाही तर शरद पवारांकडून उतरणार असल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
अजित पवारांचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार शरद पवारांच्या गटातून राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे अजित पवारांविरोधात रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढून घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता दुसरा पुतण्या तो ही सख्खा उभा ठाकणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार आहे.
श्रीनिवास पवार हे उद्योजक आहेत. ते राजकारणात फारसे इन्टरेस्टेड नाहीत. अजित पवारांच्या पहिल्या बंडावेळी श्रीनिवास पवारांनीच महत्वाची भुमिका बजावली होती. अजित पवार कुठे आहेत याची शोधाशोध सुरु असताना ते या बंधुराजाच्या घरी थांबलेले होते. परंतु, यावेळच्या बंडावेळी अजित पवारांनी श्रीनिवास पवारांची भेट घेतली होती. परंतु यावेळी राजकारणाचे फासे काही उलटे पडल्याचे दिसत आहेत. याच श्रीनिवास पवारांचे पूत्र युगेंद्र हे शरद पवारांच्या बाजुने दिसून आले होते.
युगेंद्र पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. यावरून युगेंद्र हे सख्खा काकांच्या विरोधात शरद पवारांच्या आखाड्यातून शड्डू ठोकणार असल्याची चर्चा राजकीय गल्ल्यांमध्ये सुरु झाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतची बातमी दिली आहे.