नवी मुंबई : ‘शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या अडतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. बाजार समित्यांना भेट देऊन सर्वांचे मत ऐकून घेतले जात आहे. शेतकऱ्यांवरील थोडासा भार ग्राहकांवर टाकता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. याविषयी तोडगा काढण्यासाठी १५ जानेवारीला मंत्रालयात विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे,’ अशी माहिती पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पणनमंत्र्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील व्यापारी, अधिकारी व इतर घटकांशी अडतीविषयी चर्चा केली. भाजी व फळ मार्केटला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. भाजी मार्केटमध्ये ८ टक्के तर फळ मार्केटमध्ये १० टक्के अडत घेतली जात आहे. या रकमेमध्ये कपात करता येईल का, शेतकऱ्यांकडून सर्व रक्कम वसूल न करता काही रक्कम ग्राहकांकडून वसूल करता येईल का, याविषयी चर्चा केली. व्यापारी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडूनच अडत घेणे सोयीस्कर आहे. ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यातअडचणी असल्याचे मत व्यक्त केले. मुंबई हे टर्मिनल मार्केट आहे. या ठिकाणी खरेदी केलेला माल मोठ्याप्रमाणात येत असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले. पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘अधिवेशन सुरू असताना घाई-गडबडीत अडत बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यभर व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. यामुळे आदेशास तत्काळ स्थगिती दिली आहे. याविषयी शेतकरी व बाजार समितीमधील घटक सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ नाशिक, पुणे परिसरातील बाजार समित्यांनाही पणनमंत्री भेट देणार आहेत. यानंतर १५जानेवारीला मंत्रालयात व्यापारी, शेतकरी व सर्व घटकांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बाजार समितीचे सचिव सुधीर तुंगार, शरद जरे, व्यापारी प्रतिनिधी अशोक हांडे, संजय पानसरे व इतर उपस्थित होते. बाजार समितीमध्ये सर्व अडत शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. यास राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींनी विरोध करण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भार कमी करण्यासाठी काही रक्कम शेतकरी तर काही रक्कम ग्राहकांकडून वसूल करण्याविषयी तोडगा काढण्याची तयारी सुरू आहे.
अडतीचा प्रश्न लवकर सोडविणार
By admin | Published: January 07, 2015 2:03 AM