मुंबई: सत्ता स्थापनेवरून शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला 'सामना' कायम राहणार असल्याचं दिसत आहे. शिवसेना लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडेल, असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'सामना'मधून राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरुन भाजपाला लक्ष्य केल्यानंतर आज सकाळी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल केलं होतं. त्यावर भाष्य करताना राष्ट्रपती राजवटीची भाषा म्हणजे राज्यानं दिलेल्या जनादेशाचा अपमान असल्याचं राऊत यांनी म्हटलं. 'घटनेचा विचार केल्यास राष्ट्रपती हे देशातलं सर्वोच्च पद आहे. त्या पदाचा भाजपाकडून गैरवापर होत असेल तर ते देशासाठी धोकादायक आहे,' असं राऊत म्हणाले. सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; पवार म्हणतात...पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भेटीवरदेखील भाष्य केलं. शिवसेना, भाजपा वगळता राज्यातील इतर सर्व पक्ष एकमेकांशी संवाद साधत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पवारांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतली होती. मात्र त्यात राज्यातील राजकारणाबद्दल चर्चा झाल्याचं ते म्हणाले. आम्ही लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडू असं म्हणत असतानाच शिवसेना अखेरच्या क्षणापर्यंत युतीधर्माचं पालन करेल हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.कधी संपेल शिवसेना, भाजपामधील सुंदोपसुंदी? शरद पवारांची मोठी भविष्यवाणीगेल्या काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून कलगीतुरा सुरू आहे. राज्यात 56 जागा जिंकणारी शिवसेना सत्तेच्या समान वाटपासाठी आग्रह आहे. लोकसभेवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळावा. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशा शिवसेनेच्या मागण्या आहेत. मात्र पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याशिवाय गृह, अर्थ, महसूल, नगरविकास यांच्यासारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला न देण्याची भूमिका भाजपानं घेतली आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना लवकरच अॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 12:00 PM