Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मी नेहमी सांगत आलो होतो, मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. ते बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागत आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीच्या सांगण्यावरुन प्रचार केला. आता ओबीसी समाज एकटवल्याने मनोज जरांगे यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरुन घेतली आहे. रणांगणात लढायला वाघाचे काळीज लागते, गनिमी कावा करायचा काळ गेला, या शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.
आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यातच आता लक्ष्मण हाके यांनी ३५ मतदारसंघात पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार
शरद पवार यांच्या उमेदवारांना पाठिंबा असेल पण तो अटीवर असेल. ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का लावणार नाही, याला जर शरद पवार यांच्या उमेदवारांचे समर्थन असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. शरद पवारांचा प्रचार नाही. शरद पवारांचा एखादा ओबीसी उमेदवार असेल, तो ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला कन्व्हिन्स करणार असेल तर आम्ही त्यांची सभा घेऊ. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. माझ्या ६०-७० सभा महायुतीच्या विरोधात झाल्या आहेत. त्यामुळे मी महायुतीचा आहे, असे म्हणू शकत नाही, असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. ओबीसीचे जे निवडून येणारे उमेदवार आहेत ते कोणत्याही पक्षाचे असोत आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. आमचे पाठिंबा असलेले उमेदवार – सांगोला, जत, मुखेड, मान, लातूर पूर्वचे आहेत. कोणत्याही पक्षाचा असो. पण निवडून येणारा असावा, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बाँड पेपर सोडा हो, संविधानाची शपथ घेऊन लोक जागत नाही. मी तर जरांगे पाटील यांना शिलालेखावर लिहून घ्या म्हणून सांगितले होते. त्यामुळे बाँड पेपर सोडा. कुणाची किती नियत साफ आहे हे आम्हाला कळते. मनोज जरांगे पाटील हा दिवसाला भूमिका बदलणारा माणूस आहे. ते मुंबईच्या वेशीवरुन माघारी परतले होते. त्यांचा राजकारण, निवडणूक याबद्दल अभ्यास नाही. ज्यांनी जरांगे यांना पाठींबा दिला होता, त्यांचा कार्यक्रम आता ओबीसी करणार, त्यांना निवडणुकीत पाडणार, ज्यांनी पत्र दिले, त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार, असा एल्गार हाके यांनी केला.