बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्ध्यातून लोकसभा लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. राष्ट्रवादीतील गटा-तटाच्या पेचामुळे सुळे यांनी केलेले विधान सर्वांच्या भुवया उंचावत आहे.
अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी ते पवार कुटुंबातूनच कोणाला उतरवितात हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांच्याशी संघर्ष अजित पवारांना करावा लागणार आहे. गेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शरद पवार गटाने थेट अजित पवार गटाशी संघर्ष टाळला होता. तसेच संसदेतही खासदारांच्या सदस्य रद्द करण्यावरून सुळे आणि पवारांना वगळत अजित पवार गटाने संघर्ष टाळला होता.
येत्या तीन महिन्यांत लोकसभा निवडणूक लागणार आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांनी तसे सुतोवाच केल्याची चर्चा आहे. कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लढायला आवडेल, असे जाहीर वक्तव्य सुळे यांनी केले आहे. तसेच त्यांनी हे पक्षाला देखील अनेकदा सांगितल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
माझे वर्ध्याशी भावनिक नाते आहे. माझी कर्मभूमी बारामतीच असणार आहे. परंतू, वर्ध्याच्या मातीशी माझे माहिती नाही परंतू ते शब्दांत सांगता येत नाहीय. वर्षातून दोनदा तरी माझी गाडी वर्ध्याला वळते, असे सुळे म्हणाल्या आहेत. माझा अदृश्य शक्तींवर विश्वास आहे. आमच्याकडे घड्याळ चिन्ह अजूनही आहे. मे पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही सुळे म्हणाल्या.