अजित पवारांनी शपथविधीच्या घडामोडींनंतर शरद पवारांकडून होणाऱ्या कारवायांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. जशास तसे अशी पाऊले उचलली असून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच अजित पवारांसह नऊ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका देणाऱ्या, व्हीप बजावणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दिली आहे.
आज अजित पवारांनी पुन्हा एक मोठा धक्का राष्ट्रवादीला दिला आहे. हे बंड आहे की नाही हे कायदा ठरवेल असे अजित पवार म्हणाले. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहतील असे स्पष्ट केले आहे. काल त्यांनी कायदेशीर नाही तर जनतेकडे जाऊन लढा देऊ असे म्हटले होते परंतू रात्री काही लोकांनी ज्या गोष्टी केल्या, ज्या पत्रकार परिषधा घेतल्यात त्यावर आता आम्ही देखील तयारी केल्याचा इशारा अजित पवारांनी दिला.
यावर सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी काही चिडक्या स्वरात उत्तर दिले. आम्ही हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष चाललेला नाही. पक्षात बेरजेचे राजकारण आम्ही करतो. तिथे काय हकालपट्टी करण्यासाठी बसलो आहे का, असे विचारत त्यांनी सुप्रिया सुळेंवर थेट बोलणे टाळले. याचबरोब पवार यांनी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवरही तोंडसुख घेतले.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले...प्रफुल्ल पटेल यांनी मी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांची विधिमंडळ नेता, प्रदेशाध्यक्ष पदी सुनिल तटकरे आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. अजित पवार विधिमंडळ पक्षाचे नेते यांची निवड झाली आहे. ही नियुक्ती पक्ष करतो. नव्या नियुक्त्यांबाबत विधानसभा अध्यक्षांना कालच कळविले आहे. पक्ष व्हीप नेमतो, त्यानुसार अनिल पाटील यांना महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या प्रतोदपदी नेमले आहे. ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. पुढे जी संघटनात्मक कारवाई करायची असेल ती केली जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.