मुंबई: देश जवळपास गेल्या वर्षभरपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. देशात तब्बल १ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ९५ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली. तर जवळपास दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना संकटावर पूर्णपणे मात करण्यासाठी आजपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला प्रारंभ केला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली.कोरोना संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांना कोरोना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांना मोफत मिळणार का, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना लस मोफत मिळणार की नाही, याबद्दलचा निर्णय अद्याप केंद्र सरकारनं घेतलेला नाही. केंद्रानं यासंदर्भातला निर्णय घेतला की मग आम्ही निर्णय घेऊ, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
कोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 12:47 PM