'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी घोषणा आता भाजपवाले देणार का? अजित पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 06:13 PM2023-06-13T18:13:20+5:302023-06-13T18:25:52+5:30
गेल्या ३० वर्षात अशी जाहिरात आजपर्यंत कधी आपण पाहिली नाही. एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता? फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय आहेत, हे भाजपाला मान्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये आज छापून आलेल्या शिवसेनेच्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषण होत होती. आता मात्र राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. गेल्या ३० वर्षात अशी जाहिरात आजपर्यंत कधी आपण पाहिली नाही. एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता? फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय आहेत, हे भाजपाला मान्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
गेल्या ३० वर्षात अशी जाहिरात कधी पाहिली नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला पुन्हा हेच मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे. हे पाहून आनंद झाला, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. तसेच, लोकांचा इतका पाठिंबा आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही? त्यांना निवडणुका घेण्याची भीती वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्या जाहीर करा आणि मैदानात या. जनता कुणाच्या पाठीशी आहे हे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळेल. राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा आता भाजपवाले देणार का? या जाहिरातीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा ऐकायला आवडेल, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.
एकनाथ शिंदे किंवा जाहिरात देणार इतक्या लवकर कसे काय बाळासाहेबांना विसरले मला काय कळले नाही. कारण मुळातच आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघेंच्या विचारांचे सांगून त्यांनी तो पक्ष स्वत:कडे खेचून घेतला. परंतु तिथे आनंद दिघेंचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही कुठे दिसला नाही. अशाप्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या पण स्वत:च ठरवून सर्वेक्षण केले. पण हे सर्वेक्षण कोणी केलं? कोणी सांगितलं की कोणाला किती टक्के पसंती आहे? असे प्रश्न उपस्थित करत सर्व्हेची जाहिरात करण्याचा एक विश्वविक्रमच राज्याच्या प्रमुखांनी केला आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
याचबरोबर, पुढील 15 दिवसात शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्षे पूर्ण होईल. वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते विविध पदांसाठी इच्छुक आहेत, आता सरकारला एक वर्ष पूर्ण होईल तरी सुद्धा निवडणुका घेत नाहीत. उन्हाळा सुरु असतानाही तुम्ही निवडणूका घेतल्या नाहीत, त्यामुळे आता निवडणुका जाहीर करुन पावसाळा संपल्यासंपल्या तुम्ही निवडणूक घेऊ शकता, पण तसे तुम्ही करणार नाही, कारण निवडणुका घेण्याची तुम्हाला भीती वाटते. यावेळी त्यांनी फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय हे भाजपाला मान्य आहे का? असा अप्रत्यक्ष टोलाही मुख्यमंत्र्यांना लगावला.