मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणतात. मातोश्रीच्या वटवृक्षाखाली वाढलेले राज ठाकरे त्या सावलीतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केली. सुरुवातीच्या वर्षांमधील झंझावात आणि आलेले यश टिकले नाही. एकेकाळी १३ आमदार, नाशिक महापालिकेत सत्ता, मुंबई, ठाणे, पुण्यात नगरसेवकांची मोठी संख्या असे बळ असलेली मनसे आता चाचपडत आहे. या परिस्थितीत राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. सहा मोठे पक्ष, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांच्या गर्दीत टिकण्याचे आव्हान मनसेसमोर आहे.
राजकीय भूमिका बदलल्या, कधी मोदींची प्रशंसा तर कधी मोदींची चिरफाड असेही केले. भूमिकांचे असे अनेक झोके घेणारे राज आता स्वबळावर लढणार आहेत. निवडणुकीसाठी लागणारे कार्यकर्त्यांचे नेटवर्क त्यांच्याकडे प्रत्येक मतदारसंघात नाही. या-त्या पक्षात नाराज झालेले राज यांच्या इंजिनावर लढतील असे दिसते.
‘करो वा मरो’ची निवडणूकही निवडणूक राज यांच्यासाठी ‘करो वा मरो’ची असेल. आपल्यासह पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठीच्या या संधीचे ते सोने करतात की नाही यावर त्यांचे भवितव्य ठरेल. पुढील वर्षीच्या सुरुवातीला महापालिकांच्या निवडणुका होतील. तेव्हा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या पट्ट्यात आपले नगरसेवक निवडून आणायचे तर राज यांना विधानसभेत चांगले अस्तित्व दाखवावे लागेल. राज यांचे स्वबळ महायुतीला मारक ठरेल की महाविकास आघाडीला? तर, त्या-त्या मतदारसंघांच्या परिस्थितीवर आणि उमेदवारांवर ते अवलंबून असेल.