- अण्णा नवथर लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील आणि पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये कोविडमधील कामामुळे राज्याला परिचित झालेले नीलेश लंके असा सामना रंगला आहे. वारसा जिंकणार की नवा चेहरा ? याची उत्सुकता या मतदारसंघाला आहे.
अजित पवार गटाची साथ सोडून नीलेश लंके हे शरद पवार गटात आले. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात पवारांनी प्रस्थापित घराण्यांऐवजी लंके यांच्या माध्यमातून सामान्य चेहरा मैदानात उतरविला आहे. डॉ. सुजय हे आपला राजकीय वारसा व आपले शिक्षण प्रचारात सांगत आहेत. तर आपण सामान्य घरातील आहोत व डॉक्टर नसलो तरी कोविडमध्ये जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविणारे डॉक्टर आहोत, असा लंके यांचा प्रचार आहे. विखे हे परिवारामुळे लोकप्रिय आहेत; तेवढीच लोकप्रियता लंके यांचीही आहे. विखेंकडे यंत्रणा आहे. तर लंकेकडे संघटन आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मतदार संघात मुुलासाठी तळ ठोकून आहेत.
भाजपातील नाराजांची भूमिका काय ?भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विखे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत उमेदवारीवर दावा केला होता. तसेच गत विधानसभा निवडणुकीत विखे यांच्यामुळे पराभव झाल्याची तक्रार त्यांच्यासह इतरांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती; मात्र झाले गेले विसरून भाजपतील सर्वचजण विखे यांच्यासाठी कामाला लागले आहेत; परंतु भाजपची एकी मतपेटीत दिसणार का ? ही उत्सुकता आहे.
गाजत असलेले मुद्दे विखे यांनी इंग्रजी भाषेवरुन केलेले वक्तव्य. नीलेश लंके यांचे पोलिसांबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य. खासदार लोकांच्या संपर्कात आहेत का ?
निवडणुकीतील कळीचे मुद्देसाकळाई पाणी योजना, कुकडीचे पाणी, ताजनापूर प्रकल्प जैसे थे.सुपा वगळता एकही एमआयडीसी विकसित नाही, रोजगार देणारे प्रकल्प आणले नाहीत. शेतमाल, दुधाला भाव देण्यात सरकार अपयशी.मतदारसंघात शासकीय मेडिकल, अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. नगर-पुणे रेल्वे सेवा प्रलंबितच.
नेत्यांची भूमिका महत्त्वाची माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, प्रताप ढाकणे हे नेते उघडपणे लंके यांच्या सोबत आहेत. जिल्ह्यातील अनेक कारखानदार महायुतीसोबत असले तरी आतून काय भूमिका घेतील याचा अंदाज नाही.