सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर नाना पटोलेंचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:08 PM2022-02-17T12:08:24+5:302022-02-17T12:08:53+5:30
राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.
मुंबई : राज्यातील सरकार १० मार्चला बदलणार, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. १० मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याला जोडून पाटील यांच्या विधानाकडे बघितले जात आहे. पटोले यांनी बुधवारी भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना, सरकारमध्ये जे चालले आहे त्यालाही दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान केले.
सरकारमध्ये काँग्रेसचे १२ मंत्री आहेत. सध्या पाच राज्यांची निवडणूक सुरू आहे. माझे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. १० मार्चपर्यंत संधी द्या. आपल्या सरकारमध्ये जे काही चालले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आपल्या हाती आहे, असे पटोले म्हणाले. पटोले यांच्या या विधानामुळे आता काँग्रेसमध्ये काही मंत्र्यांना डच्चू मिळून काहींना नव्याने संधी मिळणार का, मंत्र्यांपैकीच कोणाला विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार का? अशी चर्चासुरू झाली आहे. स्वत: पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच मंत्री होण्यासही इच्छुक असल्याचे म्हटले जाते.
सरकार पाडण्याचे भाजपचे दावे फुसके आहेत. महाविकास आघाडी एकसंध असून सरकार मजबूत आहे. भाजपच्या दबावतंत्रामुळे हे सरकार कधीही पडणार नाही. भाजपच्या, केंद्राच्या दडपशाहीचा आम्ही एकजुटीने प्रतिकार करू. त्यांना कितीही तारखा देऊ देत सरकार मजबूत आहे. - नाना पटोेले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस