मुंबई - भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे. ओबीसींना उमेदवारीत झुकते माप देण्यात आले आहे. ११ जागांसाठीची ही निवडणूक होणार की बिनविरोध निवडले जाणार, हा सस्पेंस आहे.
बीड लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. परिणय फुके हे कुणबी समाजाचे आहेत. सदाभाऊ खोत मराठा समाजाचे तर टिळेकर माळी समाजाचे आहेत. अमित गोरखे हे पिंपरी-चिंचवडचे भाजप कार्यकर्ते आहेत. खोत, फुके, टिळेकर व गोरखे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.
अजित पवार गटाकडून गर्जे, विटेकर?अजित पवार गटाला दोन जागा मिळणार असून, त्यासाठी शिवाजी गर्जे (मुंबई) आणि राजेश विटेकर (परभणी) यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. गर्जे यांच्या नावाची शिफारस एकत्रित राष्ट्रवादी असताना राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी झालेली होती. पण, त्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. विटेकर यांनी २०१९ मध्ये परभणीतून राष्ट्रवादीतर्फे लोकसभेची निवडणूक लढविली होती. पण, ते पराभूत झाले होते.
मविआतर्फे प्रज्ञा सातव, जयंत पाटील काँग्रेसने माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली. या जागेसाठी माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाचीही चर्चा होती. पण, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरविले जाणार आहे. मविआला आणखी एक जागा मिळणार असून, त्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाचा पाठिंबा मिळू शकतो. उद्धव सेनेतर्फे मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज मंगळवारी भरला जाऊ शकतो. तसे झाले तर निवडणूक अटळ असेल.
कुणाला किती मिळणार जागा? : भाजपला (एक मित्रपक्षासह) ५, अजित पवार गटाला २, शिंदे सेनेला २ आणि मविआला २ असे वाटप होईल. शिंदे सेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
जानकर राज्यसभेवर? : भाजपतर्फे रासपचे महादेव जानकर यांना विधानपरिषदेवर पाठविणार अशी चर्चा होती. परंतु, जानकर यांना राज्यसभेवर पाठविले जाण्याची शक्यता आहे. त्यांचाही तसाच आग्रह असल्याचे कळते.