मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा निकालावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर लवकरच पुढील रणनीती ठरवली जाईल असं विधान मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकरांनी केले आहे.
बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुंबईसह पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा येथील महत्त्वाचे पदाधिकारी आजच्या बैठकीत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. यापुढची रणनीती लवकरच ठरवली जाईल. गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभेसाठी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचाराचं काम केले. पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जे योग्य आहे त्यानुसार निर्णय घेतली जातील. स्वबळावर असेल की युतीत लढायचं हे योग्य वेळी तुम्हाला कळेल असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी ३ जूनला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार देऊ नये अशी वैयक्तिक विनंती केली होती. त्या विनंतीस मान देऊन राज ठाकरेंनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या गोष्टी वारंवार होऊ शकत नाही ते राज ठाकरेंनी फडणवीसांना सांगितले अशीही माहिती सरदेसाई यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, ज्या ज्याठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतल्या तिथे महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत. महायुतीचे १७ खासदार निवडून येण्यासाठी जेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तेवढीच मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. फोडाफोडीचं राजकारण कुणालाच आवडत नाही. त्याचा परिणाम होतोच. या निवडणुकीत ते दिसले. त्यामुळे आता जो कुणी फुटणार असेल तोदेखील भविष्याचा विचार करेल आणि इकडे तिकडे जाईल. आम्ही जसं एका जागेवर घट्ट आहोत तसे तेदेखील राहतील असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.
आम्ही NGO नाही तर राजकीय पक्ष
जेव्हा आमच्या पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढली आहे. आमची सामाजिक संस्था नाही. राजकीय पक्ष आहे. विधानसभा, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा निवडणुका पक्ष लढणार आहे. पुढे काय होईल माहिती नाही. प्रत्येक पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे यांना उमेदवारी भरू नका असा आदेश राज ठाकरेंनी दिला असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.