मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) मध्ये रूपांतर केलेल्या ५ बसगाड्या पहिल्या टप्प्यात मुंबईत किंवा नाशिकमध्ये चालविण्याचा विचार सुरू आहे, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी मुंबई आणि नाशिकमधील पुरवठादारांकडून कोटेशन मागविण्यात आले आहे. जो पुरवठादार कमी दरामध्ये एलएनजी इंधनाचा पुरवठा करेल, त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
डिझेलपेक्षा एलएनजीचे दर कमी असल्याने एसटीच्या संचालनाचा प्रति किमी दर कमी होणार आहे. एलएनजीच्या एका टाकीमध्ये ७०० ते ७५० किमीपर्यंत बस धावू शकते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबत पैशांचीसुद्धा बचत होणार आहे. सध्या मुंबईत एलएनजीचे दर प्रति किलो ७२ रुपये आहे तर नाशिकमध्ये प्रति किलो ७६ ते ७८ रुपये इतका आहे. त्यामुळे यापेक्षा कमी दराने पुरवठा करण्यासाठी पुरवठादार निश्चित झाल्यानंतर या ५ गाड्या कोणत्या ठिकाणी सुरू कराव्यात याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. भविष्यात एसटी महामंडळ स्वमालकीचा एलएनजी पंप उभारणार असून, त्यानुसार एलएनजी गाड्यांचा ताफा वाढविणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
एसटीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या १४ हजार डिझेल बसगाड्यांपैकी ५ हजार बसचे एलएनजीमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाकडून ९७० कोटींचा निधी मिळणार आहे.
डिझेल इंजिनला एलएनजीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी प्रतिगाडी सुमारे ५.१५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
वायुप्रदूषण कमी करणे, डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने एसटीने या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रारंभ केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.