आज विधानभवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यासंदर्भात आपल्याला हळू-हळू कळेलच, आम्ही कुठेही फुटलेलो नाही, आम्ही एकत्रच आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, "आम्ही तिन्ही पक्ष बऱ्याच दिवसांनंतर एकत्र भेटलो. आमचे सर्व सहकारी, आमदार आम्ही एकत्र आलो. चांगल्या गप्पा झाल्या. यावेळी, तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, आपल्याला हळू हळू कळेलच, महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोना संकटाचा सामना केला, तर हे संकट काय? ते संकट तर जगावर आलेले एक मोठे संकट होते. कुणाला काही कळत नव्हते. पण त्याचा सामना महाविकास आघाडी सरकारने केला. महाराष्ट्राला दिलासा देणे, महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा पुरविणे. अशा पद्धतीने आम्ही त्याचा सामना केला. त्यापुढे हे संकट काहीच नाही."
यावेळी, महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? असे विचारले असता ठाकरे म्हणाले, आम्ही बऱ्याच दिवसांनंतर एकत्र भेटलो आहोत. आम्ही कुठेही फुटलेलो नाही. एकत्र आहोत. त्यामुळे आता पुढे काय करणार आहोत, हे जेव्हा करू, तेव्हा तुम्हाला सांगूच.
...तोवर आपल्या देशात लोकशाहीच राहील, बेबंदशाही येणार नाही -शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, "मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण कायद्यासमोब सगळे सारखेच असतात. पण त्याच वेळेला जनता सर्व काही उघड्या डोळ्याने बघत असते. न्यायदेवता आणि जनता, हे लोकशाहीचे आधारस्तंभ जोवर आपल्या देशात मजबूत आहेत. तोवर आपल्या देशात लोकशाहीच राहील बेबंदशाही येणार नाही," असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.