मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. तर दुसरीकडे, भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याची माहिती प्रसारमाध्यांद्वारे समोर येत आहे. त्यानुसार, मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या भेटीमागील नेमकं कारण काय? हे अद्याप समोर आले नाही. मात्र, ही भेट भाजपा आणि मनसे यांच्यातील युतीबद्दल असल्याचे म्हटले जात आहे.
मनसे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे आता राज्यात भाजपा-मनसे युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे. दरम्यान, या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, "आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांना भेटायचे होते. त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती."
याचबरोबर, "यापुढेही प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेट नक्कीच होतील. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असे नाही. एकमेकांना भेटणं महाराष्ट्राचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे आम्ही देखील त्यांना भेटलो", असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहे. विविध राजकीय नेते या निर्णयावर आपलं मत मांडत आहे. याचदरम्यान मनसेने देखील अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?, असा सवालही उपस्थित केला आहे.