चीनसह आशियाच्या एका मोठ्या भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा पसरण्यास सुरूवात झाली आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांत जेवढे रुग्ण सापडले नव्हते, तेवढे दररोज सापडू लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जगात पुन्हा कोरोना डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठी झळ बसलेल्या भारताने कोरोना प्रतिबंधक उपायांची तयारी सुरु केली आहे. तर यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
"चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. दक्षिण कोरियामध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीयेत, रस्त्याच्या दुतर्फाही रुग्णांना ठेवलं जात आहे अशी परिस्थिती पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर पुढच्याला ठेच, मागचा सावध या म्हणीप्रमाणे आपल्यालाही काळजी घेणं आवश्यक आहे. केंद्र शासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. राज्य शासन केंद्राच्या अनुषंगानं कारवाई करेल," असं राजेश टोपे म्हणाले. चौथ्या लाटेबद्दल बोलताना त्यांनी आपल्याला काळजी घेत राहिलं पाहिजे, असं सांगितलं.
"युरोप, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आपणही त्यामुळे बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही, अशा आशयाचं पत्र केंद्रानं राज्याला पाठवलं आहे. ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलं असून त्या पत्राच्या अनुषंगानं योग्य ती कारवाई करण्यात येईल," असंही ते म्हणाले.
राज्यांना सतर्कतेचे आदेशकेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना लाटेवरून राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य, आरोग्य सचिवांना पत्र लिहून पंचसूत्रीचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे. या साऱ्यांना पत्राद्वारे सावध करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चिंताजनक नाही, याचा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासनाने बेफिकीर राहू नये. यामध्ये चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रोटोकॉल यांचा पंचसूत्रीचा समावेश करण्यात आलाय.