मुंबई - शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समितीचीही घोषणा केली होती. या समितीची बैठक शुक्रवारी सकाळी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. या बैठकीत शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करणारा ठराव होणार अशी चर्चा आहे.
या समितीत असलेल्या बहुतांश नेत्यांनी पहिल्याच दिवशी पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जाहीरपणे केली होती. त्यामुळे हेच नेते समितीच्या बैठकीत वेगळी भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. मंगळवारी शरद पवारांनी राजीनामा दिल्यापासून या नेत्यांनी सलग तीन दिवस शरद पवारांबरोबर या विषयावर चर्चाही केली आहे. तसेच शरद पवारांनीही समितीचा निर्णय आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका जाहीर केली आहे.
अध्यक्ष निवड समितीत खडसेंचा समावेशराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड समितीची मंगळवारी शरद पवारांनी घोषणा केली त्यावेळी एकनाथ खडसे यांचे नाव या समितीत नव्हते. मात्र गुरुवारी शरद पवारांनी खडसेंच्या नावाचा समावेश करण्याची सूचना केली. त्यानुसार या समितीत खडसेंचा समावेश करण्यात आला असून शुक्रवारच्या बैठकीला येण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी खडसे यांना फोनही केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी आहे समितीसमितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.