मुंबई - राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिलेले नाही. तर भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे नवीन मंत्रीमंडळाची चर्चा सुरू झाली असून मंत्र्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
सत्तास्थापनेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना प्रत्येकी 14 मंत्रीपदे मिळणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या मंत्रीमंडळात महिला नेत्यांना संधी मिळणार हे तेवढंच खर आहे. यानुसार राष्ट्रवादीतून रुपाली चाकणकर, काँग्रेसमधून यशोमती ठाकूर आणि शिवसेनेतून डॉ. निलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी झाली. चाकणकर यांनी पुण्यात अनेक आंदोलने केली. जिल्ह्यात पक्षाचा आवाज बुलंद केला. तलेच विधानसभेला त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रचार केला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्या मंत्रीपदासाठी दावेदार मानल्या जात आहेत.
काँग्रेसमध्ये यशोमती ठाकूर यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे. भाजपच्या झंझावातात अनेक नेते सोडून गेले असताना ठाकूर काँग्रेससोबत कायम राहिल्या. विधानसभेला विजय मिळवून त्यांनी आपली चुनूक दाखवून दिली.
दरम्यान शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे यांचे नाव देखील मंत्रीपदासाठी चर्चेत आले आहे. निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची महिला आघाडी कायम भक्कम ठेवली आहे. महिलांच्या प्रश्नावर त्या नेहमीच आक्रमक राहिल्या आहेत. त्यांना शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी बडती मिळण्याची शक्यता आहे. त्या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.