उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेले. त्याची आठवण करून देत राणेंवर जी कारवाई केली तीच आता ठाकरेंवर करण्याचा विचार करत असल्याचे शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नारायण राणेंना अटक करण्यापर्यंत गेलेले राजकारण पुन्हा एकदा महाराष्ट्रात पहायला मिळण्याची शक्यता आहे.
नारायण राणेंनी ऑगस्ट २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंच्या कानाखाली लगावले असते असे व्यक्तव्य केले होते. यावरून नाशिकमध्ये राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच राणे कोकण दौऱ्यावर असताना त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले होते. एका केंद्रीय मंत्र्याला अशाप्रकारे वागणूक दिली गेली होती. या प्रकरणातून राणेंना निर्दोष ठरविण्यात आलेले असले तरी त्याचाच आधार घेत शिंदे गट आजच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून कारवाई करण्याचा विचार करत आहे.
जो व्यक्ती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय. असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून त्यांच्या पत्रकार परिषदेची सीडी आपण मागविली असल्याचे शंभुराज देसाई यांनी सांगितले. या सीडीतील वक्तव्यावर कायदेशीर मतही घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळपर्यंत इकडे येतील, तेव्हा यावर निर्णय घेण्यात येईल असेही देसाई म्हणाले.
राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या मुख्यमंत्र्यांबाबत असा शब्दप्रयोग याआधी त्याच पदावर बसलेल्या व्यक्तीने करणे हे अयोग्य आहे. महत्वाचे म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्याबाबत ज्यांनी वक्तव्य केलेले त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका ठाकरेंनी घेतलेली तीच आम्हालाही घेणे शक्य आहे, असे देसाई म्हणाले.