मुंबई - उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी एकदा नेतृत्व केलेच आहे. त्यामुळे आमच्यात काही मतभेद होतील असं वाटत नाही. आम्ही एकत्र बसून जो काही असेल तो निर्णय घेऊ. महाराष्ट्रात लोक उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींकडे बघून मतदान करतात. तिघांचे समर्थक एकत्रित आल्याने ताकद वाढली आहे. उद्धव ठाकरे हे मविआचे प्रमुख नेते आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात फिरून त्यांनी समाज जागरुक केला. त्यांच्या पक्षाचे नेते ते आहेत पण आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांनाही महाराष्ट्रात तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे हे दोघे एकत्रित बसून निर्णय घेतील. नेते कोण यावर मविआत संभ्रम आणि स्पर्धाही नाही. महाविकास आघाडीत एखादा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत आम्ही अजून चर्चा केली नाही अशी स्पष्ट भूमिका मांडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, इतकी वर्ष राजकारणात घालवून शरद पवारांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहचलो. त्यामुळे इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण शेवटी व्यवहारी भूमिका राजकारणात असणं आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये २-३ जण आहेत, राष्ट्रवादीत १-२ जण आहेत, शिवसेनेत काही आहेत प्रत्येकाची इच्छा असते. महायुतीतही ५-६ जण आहेत. परंतु संख्या किती याला राजकारणात महत्त्व आहे. त्यामुळे संख्या आल्याशिवाय त्यावर बोलणं अतातायीपणा होईल. महाविकास आघाडीचं बहुमत आलं तर या गोष्टी होतील. बहुमत आणायला प्राधान्य देऊ. त्यानंतर माझा पक्ष वाढवणं हीदेखील माझी नैतिक जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का या प्रश्नावर उत्तर दिले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच सत्ता मिळवायची असेल तर निवडून येण्याची क्षमता कुणाची असेल याचे थोडं आकलन केले तर सत्ता मिळू शकेल. त्यामुळे किती जागा लढल्या याला महत्त्व नसून किती जागा निवडून आल्या त्याला महत्त्व आहे. तिन्ही पक्ष समजूतदारपणाची भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तेव्हा मुख्यमंत्रीपद नाकारलं गेले, त्याबाबत प्रश्न विचारला असता तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. परिस्थितीनुसार शरद पवारांनी तसा निर्णय घेतला. नेहमी तशीच परिस्थिती असते असं नाही. निवडणुकीत संख्या निवडून आल्यानंतर या गोष्टींची चर्चा केली पाहिजे. आम्ही तिन्ही पक्ष एकदिलाने लढलो पाहिजे याला पहिले प्राधान्य आहे. सत्ता येणे याला प्राधान्य आहे असं जयंत पाटलांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जागावाटपात तिन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. तिन्ही पक्षात समतोल राखला जाईल. तपशिलवार चर्चा सुरू झाली नाही. तिन्ही एकसंघाने लढले तर महाराष्ट्रात सरकार येईल अशी शक्यता आहे. लोकसभेला आघाडी होण्यासाठी आम्ही कमी जागा लढवल्या. आम्ही १५ जागा लढवू शकलो असतो परंतु शरद पवारांनी पुढाकार घेतला आणि बऱ्याच ठिकाणी माघार घेत मित्रपक्षांना सामावून घेतले. ज्या १० जागा आम्ही घेतल्या त्या चांगल्या लढवल्या, ९ वी जागा चिन्हांच्या गोंधळामुळे पडली. महाराष्ट्रात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मित्रपक्षांनीही योगदान दिले. लोकसभेत एकसंघपणा यावा म्हणून आम्ही २ पावलं मागे होतो पण महाराष्ट्रात आम्ही ज्याठिकाणी निवडणूक लढवतो, नेते गेले असले तरी बहुसंख्य कार्यकर्ते आहेत तिथे जागा लढवाव्या लागतील असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.