शिवसेनेसोबत मी पूर्वी काम केले आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना ही भेटत असतो. राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. उद्धव ठाकरेंच्या ऑफरला विनोदाने घ्यावे. आघाडी तुटली म्हणजे मैत्री तुटत नाही. मतभेद झालेत, मनभेद नाहीत असे सांगत उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येतील का, या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे संकेत दिले आहेत.
अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. माझ्या आणि मोदींमध्ये तणाव नाही. आमचे नेहमी बोलणे होत असते, असा खुलासा गडकरी यांनी केला. उद्धव ठाकरे भाजपासोबत येतील का, या सवालावर गडकरी यांनी भाजपात जो आला, पदरी पडले तो पवित्र झाला, असे सांगितले.
दुसऱ्या राजकीय पक्षातील कोणीही माझ्याकडे दु:ख व्यक्त करण्यासाठी येत नाही. अनेक लोक तर्कवितर्क लावत असतात. ज्यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत ती मैत्री मी जपण्याचा प्रयत्न करतो. परंतु मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे, असे गडकरी म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात गडकरी यांनी ही मते व्यक्त केली.
सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही. राष्ट्रकारण, विकास कारण हे खर राजकारण आहे. त्यामुळे मी ठरवलंय वागताना गुणात्मक पद्धतीने वागले पाहिजे. कमरेखालचे वार मी करत नाही, असेही गडकरी म्हणाले.