- मोसीन शेख
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात असे झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सांभाळू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्री असायला हवे अशी मागणी खुद्द उद्धव ठाकरे यांनीचं केली होती.
मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद महत्वाचे समजले जाते. त्यामुळे हे पद आपल्या पदरात पाडण्यासाठी सत्तेत असेलल्या पक्षातील नेत्यांकडून रस्सीखेच होत असल्याचे आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र गेल्यावेळीच्या सरकारमध्ये आत्ताचे असलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सुद्धा स्वता:कडेच ठेवेले होते. तर आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा गृहखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर शरद पवार आणि ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय सुद्धा झाला असल्याची माहिती आहे.
मात्र मवाळ स्वभाव असलेले उद्धव ठाकरे हे काटेरी मुकुट समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री पद सांभाळू शकतात का ?असा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. हे पद सांभाळताना अनकेदा कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे राज्यातील परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहखाते स्वतंत्र असायला पाहिजे अशी मागणी अनकेदा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्यावेळीच्या सरकारमध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंनी अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विकासकामांमध्ये खूप व्यस्त असतात, तर विकास करताना सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे राज्यात गृहखात्याला पूर्णवेळ देणारा गृहमंत्री देण्यात यावा अशी मागणी केली होती. परंतु आता स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गृहखाते म्हणजे काटेरी मुकुट
राज्यातील मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपद सर्वात महत्वाचे समजले जाते. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जवाबदारी याच खात्याच्या मंत्र्यांकडे असते. आत्तापर्यंत राज्याने अनेक गृहमंत्री पहिले आहेत. मात्र त्यांना सुद्धा या पदावर असताना अनेक अडचणी व आरोपांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांची छोटीशी चूक सुद्धा विरोधकांसाठी आरोपाचा मुद्दा ठरतो. उत्कृष्ट असे गृहमंत्री समजल्या जाणाऱ्यांपैकी एक असलेले आर.आर.पाटील यांनासुद्धा 26/11 च्या हल्ल्यानंतर आपल्या एका वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे काटेरी मुकुट समजल्या जाणारे गृहखाते उद्धव ठाकरे हे सांभाळतील का ? अशी चर्चा पाहायला मिळत आहे.