लोकसभेचे तिकीट न मिळालेले महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. यापैकी भाजपाचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असून त्यांनी नुकतीच संजय राऊतांची भेट घेतली आहे. तर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे मात्र राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. अशातच शिंदे गटाला धक्का देण्यासाठी झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे गोडसेंना माफ करणार का, असा सवाल उपस्थित होत होता.
यावर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. हेमंत गोडसे कोण आहेत, कुठले खासदार आहेत. त्यांना आम्ही निवडून दिले आहे. आमच्याकडून कोणत्याही गद्दांरासाठी दरवाजे उघडे नाहीत. जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले, तर हा निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिकांचा अपमान आहे, अशा शब्दांत गोडसेंना मातोश्रीचे दरवाजे उघडे नाहीत, असे राऊत म्हणाले आहेत.
व्हीव्हीपॅट संदर्भात सुप्रीम कोर्टाने अजून निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय झाल्यास देशातील लोकशाहीसाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरेल. भ्रष्टाचारातून निवडणुका कशा जिंकता येतील?, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे कसे गोळा केले जातात? आणि ते निवडणुकीसाठी आणले जातात याबाबत इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणानंतर देशात एक वातावरण निर्माण झाले आहे. ईव्हीएमवरून तुम्ही कोणालाही मत द्या, मत कमळालाच जाणार. यामुळे मतदारांमध्ये भीती आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
संपूर्ण जगातून ईव्हीएम हटवली गेली. मग भाजपला ईव्हीएम वर एवढं प्रेम का? सुप्रीम कोर्ट जर व्हीव्हीपॅट संदर्भात निर्णय घेत आहे, तर संपूर्ण देश या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करेल. सरकारवर टीका करण्याऐवजी हे निर्णय निपक्ष आहेत. हे निर्णय लोकशाही वाचवण्यासाठी आहेत, आणि हे निर्णय जनतेच्या आणि राष्ट्राच्या हिताचे आहेत. ईव्हीएम हटी, दुर्घटना घटी भाजपने हिंमत दाखवायला हवी, असे आव्हान राऊत यांनी भाजपाला दिले आहे.
वंचितवर काय म्हणाले...वंचितच्या नेत्यांनी चर्चा बंद केली आहे, आम्ही नाही. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे. पाच जागांच्या प्रस्तावात अकोला सुद्धा आहे. रामटेक शिवसेनेची जागा असून देखील दिलेली आहे, धुळे होती. मुंबईतील एक जागा देण्याच्या विचारात होतो आणि पाचवी जागा सुद्धा त्यांच्यासाठी काढून ठेवली होती. आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत. वंचित चर्चा करत नाही म्हणून आम्ही देशात निवडणुका लढायच्या नाहीत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.