मुंबई: प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघासाठी 4 जागा सोडणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याबद्दलचा प्रस्ताव आंबेडकर यांना देण्यात आला असून लवकरच त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेल, असं पाटील यांनी सांगितलं. काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांसाठी 8 जागा सोडेल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. रिपाईंच्या रामदास आठवलेंचंही आघाडीत स्वागत करू, असंदेखील विखे-पाटील म्हणाले.काँग्रेस-राष्ट्रवादी 40 जागा लढवेल आणि 8 जागा मित्रपक्षांना देईल. मित्रपक्षांना अधिकच्या 1-2 जागा सोडल्या जाऊ शकतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसाठी एक पाऊल मागे येण्यास तयार आहेत, असं विखे पाटील म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, सीपीएम, आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अद्याप उत्तर आलेलं नाही, असं पाटील म्हणाले. आंबेडकर यांच्यासोबत 3-4 वेळा चर्चा झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणावं, ही त्यांची मागणी आहे. त्यांची ही मागणी आम्हाला मान्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधणाऱ्या विखे-पाटील यांनी रिपाईंच्या रामदास आठवले यांच्यावरही भाष्य केलं. 'रामदास आठवले आधी काँग्रेससोबत होते. त्यांना आघाडीत येण्याची इच्छा असल्यास त्यांचं स्वागत असेल. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबतदेखील चर्चा सुरू आहे. मात्र मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही,' असं पाटील यांनी स्पष्ट केलं.