मुंबई : गृहविभागाकडून सामान्य नागरिक व महिला यांना मोठ्या अपेक्षा असतात. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलिस दलाबद्दल विश्वास वाटावा, या दृष्टिकोनातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. नूतन गृहमंत्री म्हणून त्यांनी मंत्रालयात कार्यभार स्वीकारला. हे काम अवघड आणि ‘चॅलेंजिंग’ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे सर्व पोलिस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे. याच महिन्यात गुढीपाडवा आहे, रमजान महिना सुरू होतोय. आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती हे सगळे दिवस महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या महिन्यात ‘चॅलेंजिंग’ परिस्थिती असणार आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. बदल्या, प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप नसेलआजी-माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न राहील. पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकू. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिस बदल्यांसंदर्भात विभागात पद्धती ठरलेली आहे. वेगवेगळ्या स्तरावर दिलेल्या अधिकारांनुसार निर्णय घेतले जातील. प्रशासनात हस्तक्षेप केला जाणार नाही. प्रस्तावित शक्ती कायदा, पोलिस भरती गतिमान करणे, पोलिसांसाठी घरे बांधणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असेही वळसे पाटील यांनी बोलून दाखवले. धोरणात्मक बाबींवरच बोलणार, इतर माहितीसाठी स्वतंत्र यंत्रणायापुढील काळात धोरणात्मक बाबी असतील, त्यासंदर्भातील प्रश्नच मला विचारले जावेत. दैनंदिन छोट्यामोठ्या चौकशांबाबत संपर्क केला जातो, त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे मनात असून ती स्वतंत्र यंत्रणा आपल्याला जी माहिती मिळायला हवी ती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल, असे सांगून गृहमंत्र्यांनी आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली.
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार : वळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:24 AM