NCP Sharad Pawar: संयुक्त पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जागा वाढवण्याची मागणी करत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मी याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असून फोनद्वारेही त्यांच्याशी बोलणार असल्याची माहिती शरद पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
शरद पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे. अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे," अशी माहिती पवार यांनी दिली.
"राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा," अशी मागणी यावेळी शरद पवारांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्याकडून एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या या मागण्यांना राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.