लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी दोन प्रश्न विचारले. यावेळी शिंदे यांनी या दोन्ही प्रश्नांची अत्यंत चपखलपणे उत्तरे दिली.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरू आहे. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी विजय दर्डा यांनी शिंदे यांना दोन प्रश्न विचारले.
पहिल्या प्रश्नामध्ये दर्डा यांनी तब्येतीचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रासाठी तुम्ही पाहिजेत, तर तुम्ही तब्येतीची कधीपासून काळजी घेण्यास सुरुवात कराल असा सवाल विचारण्यात आला. यावर शिंदे यांनी तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असेल तर तब्येत पण आपोआप ठीक होत जाईन, असे उत्तर दिले.
दुसरा प्रश्न खूप कठीण होता. या सोहळ्याला मुकेश अंबानी उपस्थित आहेत. पिरामल आहेत, सिंघानिया आहेत. त्यांना गुजरात ऐवजी महाराष्ट्रात लक्ष देण्यास सांगाल का असा सवाल दर्डा यांनी विचारला. यावर शिंदे यांनी ते महाराष्ट्रावर लक्ष देतात. मुकेश अंबानी यांना आताच मी शाळांना मॉडेल स्कूल करायचे आहे असे सांगितले. त्यांनी लगेगच सांगितले मी करतो म्हणून. ते नवी मुंबईत मोठी गुंतवणूक करत आहेत. सिंघानिया देखील करत आहेत. अजय पिरामल देखील करत आहेत. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्टरमध्ये नंबर वन राज्य आहे. आता बरोबर काम सुरु आहे. तुम्ही खूप हुशार आहात. सर्व आयएएस, आयपीएस, राजकारणी आहेत, उद्योगपती आहेत. सर्व लोकांना एकाच ठिकाणी आणण्याचे काम विजय दर्डा यांनी केले आहे, असे शिंदे म्हणाले.