Chhagan Bhujbal ( Marathi News ) : आरक्षण प्रश्नावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर जरांगे यांच्या मागणीविरोधात राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शड्डू ठोकत आक्रमक भूमिका घेतली. आरक्षण प्रश्नावरून दोन गट पडल्यानंतर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांना पक्षात घेऊन भाजपकडून मोठी खेळी खेळली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चेला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टने आणखीनच बळ मिळालं. मात्र स्वत: छगन भुजबळ यांनीच आज याबाबत खुलासा करत भाजप प्रवेशाचा माझ्यासमोर कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हटलं आहे.
"अंजली दमानिया यांना ती माहिती कोठून मिळाली हे माहीत नाही. मात्र भाजप प्रवेशाचा माझ्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही," असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे. तसंच मी राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थ असण्याचं कोणतंही कारण नाही, असंही भुजबळ म्हणाले. "मी घेतलेल्या भूमिकेवर पक्षातील कोणीही टीका केली नाही. स्वत: अजित पवार यांनीही सांगितलंय की, भुजबळ त्यांच्या समाजाच्या वतीने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादीत का अस्वस्थ असेल?" असा सवाल भुजबळ यांनी विचारला आहे.
काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप," अशा शब्दांत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, आगामी काळात छगन भुजबळ खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार की राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच ठामपणे उभे राहणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.