मुंबई : १२ तासांऐवजी दर ४ तासांनी पावसाचा अंदाज देता येईल का? याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने भारतीय हवामान खात्याला गुरुवारी दिले.जून महिन्यात तीन दिवस पडलेल्या पावसाने मुंबईची दैना केली. अशी परिस्थिती भविष्यात घडू नये, यासाठी न्यायालयानेच आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. अटलबिहारी दुबे यांनी केली आहे. मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबईतील पावसाचा अंदाज सांगणारे डॉप्लर सध्या बंद आहेत. त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज हवामान खात्याला सांगता येत नाही. त्यामुळे १२ तासांऐवजी दर ४ तासांनी पावसाचा अंदाज हवामान खात्याने द्यायला हवा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली. याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश हवामान खात्याला दिले. तसेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईतील पावसाचा अंदाज सांगणारी स्वतंत्र यंत्रणाच असायली हवी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. यावरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे. (प्रतिनिधी)
दर चार तासांनी पावसाचा अंदाज देणार का?
By admin | Published: August 07, 2015 1:38 AM