मुंबई - नुकत्याच आटोपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आणि आमदार अनेकदा आमनेसामने आले. दरम्यान, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून होणारी घोषणाबाजी आणि त्याला सत्ताधारी शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी डिवचल्याने ही बाचाबाची झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. तसेच अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा इशाराही शिंदे गटाने दिला होता. दरम्यान, या मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचले आहे.
आज बैलपोळ्याच्या निमित्ताने अमोल मिटकरी यांनी सजवलेल्या आणि रंगवलेल्या एका बैलाचा फोटो शेअर केला आहे. या बैलाच्या पोटावर ५० खोके ओके असा मजकूर लिहिलेला आहे. हा फोटो शेअर करत अमोल मिटकरी यांनी आता काय या बैलाला शिंगावर घेणार का? मी म्हणतो घेऊनच बघा, असे आव्हान देत शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचले आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ५० खोके एकदम ओके, अशा घोषणा देऊन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे गटाला जेरीस आणले होते. तसेच या घोषणेची सोशल मीडियावरही खूप चर्चा झाली. त्यातच आज बैळ पोळ्या दिवशी शेतकऱ्यांनी बैलाला सजवताना या घोषणेचा वापर केल्याने त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाले.