ठाणे : राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयात ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ बोलावे असा आदेश काढला आहे. आम्ही तसे म्हटले नाही, तर तुम्ही जेलमध्ये टाकणार की पोलिसांमार्फत केस करणार, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. कोणावरही अशी जबरदस्ती करू नका.
देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी. श्वास कुठून, कसा घ्यावा, हेही तुम्हीच ठरवणार का, असा सवालही त्यांनी केला. अमृत महोत्सवानिमित्त ठाण्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत हाेते. मुनगंटीवार यांच्या आदेशाबाबत ते म्हणाले की, भारतीय संस्कारात नमस्कार केला जातो. त्या नमस्कारानेच संस्कृतीची सुरुवात होते. कोणी ‘जय भीम’ बोलतो तर कोणी ‘जय हिंद’ करतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्त्वाच्या आहात. तुम्ही लोकांना बोलायची सुरुवात करायची ती कशाने करायची, हे ठरविणार का? मग सुधीरजी मुनगंटीवार म्हणायचे की सुधीर मुनगंटीवार, असे म्हणायचे किंवा भाऊ म्हणायचे हे जाहीर करावे.
‘गळा घाेटू नका’जोरजबरदस्ती करू नका. देश स्वतंत्र झाला आहे. मिळालेले स्वातंत्र्य मोकळा श्वास घेण्यासाठी आहे. तो कुठून घ्यावा हेही तुम्हीच ठरवणार का? अशा प्रकारे भारताच्या श्वासाचा गळा घाेटण्याचा प्रकार करू नका, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आता काय ते जबरदस्तीने म्हणवून घेणार का? आणि बोललो नाही, तर ते जेलमध्ये टाकणार का की पोलिसांकरवी केसेस करणार, असा सवाल करून त्यांना मिठाला लागलेल्या कराविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते याची आठवणही त्यांनी करून दिली.