मुंबई : शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून त्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करत आहोत. आम्ही विकासकामांचा धडाका सुरू केला असून कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्वच क्षेत्रांतील कामांनी गती घेतली आहे. जनतेचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र काम करण्याची आमची तयारी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिली आहे.
पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. हे सरकार आल्यापासून सगळ्यांचा आत्मविश्वास वाढला असून परिस्थिती बदलत आहे. महाराष्ट्राकडे सगळेच आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ झटकली जात असल्याने सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दिवाळीसाठी 'आनंदाचा शिधा केवळ १०० रुपयांत दिला, त्याचा ७ कोटी लोकांना लाभ होत आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदतीच्या दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यात जवळपास ३० लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत देण्यात आली. निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील ७५५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विदेशी गुंतवणूक आणि व्यापार उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
समृद्धीचे लोकार्पण लवकरचहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ-मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर' विकसित करण्यात येत आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.