ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. शिवाजी पार्क परिसरातील बालमोहन विद्यामंदिर शाळेत त्यांनी मतदान केले. 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे', अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर दिली.
यापूर्वीही, 'आम्ही पैसे खाण्यात कमी पडलो असे वाटू लागलं आहे', अशी तिरकस भावना राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली होती.
नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे?
सत्ता मिळाल्यावर टक्केवारी घेत राहायची आणि निवडणुका आल्या की तोच पैसा प्रचारात वळवायचा धंदा भाजपा आणि शिवसेनेने चालवला आहे. प्रचारात या पक्षांनी ज्या प्रमाणावर पैसा उधळण्याचा सपाटा लावला आहे ते पाहता आम्ही पैसे खाण्यात कमी पडलो असे वाटू लागल्याची तिरकस भावना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली होती.
नोटाबंदीनंतर फक्त भाजपाकडेच पैसा दिसतोय. निवडणुकीत फक्त आपल्याकडेच पैसे राहतील अशी व्यवस्था भाजपाने केली. सगळी निवडणूकच पैशाचा खेळ बनवून टाकल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती.