अकोला: पवन ऊर्जेच्या अनिश्चिततेचा फटका महावितरणला बसला असून, त्यामुळे विजेचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. महावितरणच्या वतीने दुसर्या दिवसाच्या विजेच्या मागणीच्या अनुषंगाने नियोजन करावे लागते. पवन ऊर्जेची वीज मात्र उद्या मिळेलच याची खात्री नसते. जून महिन्याच्या प्रारंभापासून दररोज सकाळी १ ते १० आणि सायंकाळी ५ ते ११ या कालावधीत सुमारे १ हजार ते सोळाशे मे. वॅ. वीज पवन ऊर्जेतून उपलब्ध होत होती. १० जून रोजी एवढीच वीज मिळणार, असे गृहीत धरून महावितरणच्या वतीने नियोजन करण्यात आले होते; परंतु १० जून रोजी पवन ऊर्जेची उपलब्धता तब्बल सातशे ते आठशे मे. वॅ. ने घटली. परिणामी राज्यात २ ते ५ तासांचे भारनियमन करावे लागले. बुधवारी सुमारे १२०० मे.वॅ. जादाची वीज महावितरणने मिळविली होती. यातून भारनियमनमुक्त अ ते ड वर्गवारीतील भारनियमन होऊ नये, अशी अपेक्षा होती; परंतु बुधवारी पवन ऊर्जेची उपलब्धता वाढल्याने जादाचे होणारे भारनियमन झाले नाही. भारनियमन असलेल्या ई वर्गवारीतील ग्राहकांचे भारनियमनही काही काळासाठी रद्द करावे लागले. गुरुवारसाठी पॉवर एक्सचेंजमधून प्रती युनिट सरासरी ४ रुपये ७० पैसे दराने ९०० मे. वॅ. वीज आरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय उद्या जेएसडब्ल्यू प्रकल्पातून ४०० मे. वॅ. जादा वीज उपलब्ध होणार आहे.
पवन ऊर्जेच्या लहरीपणाचा फटका
By admin | Published: June 12, 2014 12:23 AM