पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान, कच्छ या परिसरात थंडीची लाट आली असताना महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुताश भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे. याला कारण प्रामुख्याने देशात सध्या दिसून येत आलेले ॲन्टी सायक्लोनमुळे उत्तर ऐवजी पूर्वेकडून येणारे वारे होय.
सध्या राज्यात बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आंध्र प्रदेश, तेलंगणा मार्गे राज्यात येत आहे. त्यामुळे उत्तरेकडील वारे मध्य प्रदेशपर्यंतच रोखले गेले आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेली आहे. त्याचवेळी लगतच्या विदर्भातील किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तसेच गुजरात, कच्छ, राजस्थान परिसरात उत्तरेकडील वारे येत असल्याने तेथील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. अबु येथे उणे ४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरले आहे.
याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येत असेल तर त्या राज्यात कडाक्याची थंडी येते. सध्या पूर्वेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे वाटेत अडविले जात आहे. थंड वार्यांबरोबरच सूर्याची उष्णता आणि परिसरातील हिरवे आच्छादन याचाही परिणाम तापमानावर होत असतो. उत्तरेकडील थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नसल्याने त्याचा परिणाम राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत नाही. त्यामुळे सध्या उबदार वातावरण राज्यातील बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. ही स्थिती अजून ४ ते ५ दिवस राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.
३१ डिसेंबर रोजी कोकण,गोव्यात तरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.