मुंबई : समाजाला मोठे करायचे असेल, तर बोंगीरवार पॅटर्न अवलंबला पाहिजे. बोंगीरवार यांच्या व्यक्तिमत्त्वात लोकाभिमुखता आणि सकारात्मकता हे दोन्ही गुण होते. बोंगीरवारसर कधीच एखाद्या गोष्टीला नकार देत नसत. लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. विनयशीलता आणिं सद्सद्विवेकबुद्धी असल्यास अधिकारांचा योग्य उपयोग करता येऊ शकतो, हे त्यांनी कायम आपल्या कृतीतून दाखवून दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शनिवारी अरु ण बोंगीरवार फाउंडेशनच्या वतीने वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योजिका संगीता जिंदाल, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, एचडीएफसीचे दीपक पारेख, बोंगीरवार फाउंडेशनच्या लता बोंगीरवार आणि यशदाचे डायरेक्टर जनरल आनंद लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींच्या व्यक्तिमत्त्वात बोंगीरवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची छबी दिसते. हे प्रेरणादायी चित्र आहे. आपल्याकडे पैशाची कमी नाही. मात्र, कल्पकतेचा आणि अंमलबजावणीचा अभाव दिसून येतो, हे पुरस्कारार्थींचे मत ऐकून बरे वाटले, असेही त्यांनी सांगितले.