बार्शी, दि. २७ - सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: बार्शीकरांच्या प्रेमाने आपण भारावलो आहोत, आपले स्वागत अशा पध्दतीने होईल याची जराही कल्पना नव्हती, याच प्रेमाच्या बळावर आपण रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकू असा विश्वास आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने व्यक्त केला.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर प्रार्थनाचे प्रथमच बार्शीत सोमवारी आगमन झाले. तिच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत क्रीडा रसिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. बार्शीत ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्जद्वारे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी लावलेले शुभेच्छांचे फलक शहरात गल्लोगल्ली दिसत आहेत. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब झाडबुके आणि प्रभाताई झाडबुके यांची नात असलेल्या प्रार्थना ठोंबरेच्या स्वागतासाठी व तिला रिओ ऑलिम्पिक शुभेच्छा देण्यासाठी तरूण, विविध पदाधिका-यांची गर्दी सकाळपासूनच प्रभाशंकरार्य बंगल्यात जमत होती. बार्शीच्या दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिलेल्या तथा माजी आमदार प्रभाताई झाडबुके या आवर्जून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. सोबत प्रार्थंनाची आई वर्षाताई ठोंबरे, थोडी बहीण प्रांजल या दोघीचीही घाई सुरू होती. दरम्यान, वडील गुलाबराव ठोंबरे यांच्यासमवेत प्रार्थंनाचे प्रभाशंकर या बंगल्यावर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. वर्षाताई यांनी प्रार्थना हिचे औक्षण करून पेढा भरवून तिचे स्वागत केले. यावेळी बार्शीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. बंगल्यात प्रवेश केल्यानंतर आजी प्रभाताई आपल्या लाडक्या नातीला कडकडून मिठी मारली. प्रार्थंनाने आपल्या आजीचे आशीर्वाद घेतले.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष राजीव देसाई यांनीही प्रार्थंनाचे अभिनंदन केले. माध्यम प्रतिनिधींच्या गराड्यात प्रार्थंनाने घरात प्रवेश केला.
प्रार्थना ही माझी दुसरी मुलगी : इम्रान मिर्झा
सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा हे आपली खूप काळजी घेतात. सानिया प्रमाणेच त्यांनी आपल्याला दुसरी कन्या मानल्याचे उदगार प्रार्थंना ठोंबरे हिने काढले. सध्या ती सानिया मिर्झा हिच्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे सानिया व त्यांच्या कुटुबियांसोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. इम्रान मिर्झा यांनी प्रार्थंना ठोंबरे हिला दुसरी मुलगी मानले आहे, याच पार्श्वभूमीवर प्रार्थंनाने आपल्या भावनांना वाट करून दिली़.
सर्वात आधी प्रार्थंना लोकमत ऑनलाईनवर
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बार्शीची सुकन्या प्रार्थंना ठोंबरे हिचे आगमन झाल्यानंतर प्रथमच बार्शीत आल्यानंतर प्रार्थंनाचे लाईव चित्रण सर्वप्रथम लाईव्ह चित्रण ऑनलाईन लोकमतने दिले.