मुंबई : प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेना सर्वाधिक जागा मिळवून अव्वल ठरली खरी़ काही प्रभागांमध्ये हातातोंडाशी आलेला घास निसटला नसता तर शिवसेना महापालिकेच्या सत्तेवरच स्वबळावर आली असती़ मात्र अटीतटीच्या लढतीत अशा काही विजयाच्या संधी निसटल्यामुळे सत्तेसाठी तलवार म्यान करून भाजपाबरोबर युतीची चाचपणी करण्याची वेळ शिवसेनेवर आता आली आहे़ युती तुटल्यामुळे शिवसेनेने २२७ प्रभागांमध्ये उमेदवार दिले़ मात्र बहुतेक प्रभागांमध्ये शिवसेनेला भाजपाच्या उमेदवाराशी सामना करावा लागला़ तर काही ठिकाणी शिवसेना-भाजपा-मनसे अशी तिरंगी लढत झाली़ या अटीतटीच्या लढतीत १५ ते २० प्रभागांवर शिवसेनेला पाणी सोडावे लागले़ सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे असे शिवसेनेचे शिलेदारही यात गारद झाले़.
महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी ११४ हा मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे़ आतापर्यंत भाजपाबरोबर युती असल्याने शिवसेनेला महापालिकेवर भगवा फडकवता येत होता़ परंतु युती तुटल्यामुळे तसेच भाजपाचे संख्याबळ तीनपट झाल्याने शिवसेनेला युती न केल्यासही आता भविष्यात झुकते माप घ्यावे लागणार आहे़ मात्र अशा काही प्रभागांमध्ये गणिते बदलली असती तर आज सत्तेसाठी संघर्ष करणाऱ्या शिवसेनेचे पारडे जड असते़ (प्रतिनिधी)तोंडचा घासही पळवला!मुंबादेवीतील प्रभाग क्रमांक २२० मद्ये दोनवेळा फेरमतमोजणी केल्यानंतर शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि भारतीय जनता पार्टीचे प्रलक्ते अतुल शाह यांना समसमान मते मिळाली. काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये शहा विजयी झाले़